तेव्हा केंद्रात मीच तुमचा मंत्री होतो

0
265
बारामती, दि.२७ (पीसीबी) – सागरी मासेमारी अधिसूचनांच्या अंमलबजावणीसाठी मत्स्य विभागाकरीता स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करावा. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स व एलईडी दिव्यांच्या साह्याने होणारी बेकायदेशीर पर्ससीनची मासेमारी बंद करावी, अशा प्रमुख मागण्या पारंपरिक मच्छीमारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्या.
याप्रसंगी पवार यांना ‘मत्स्य दुष्काळ – राष्ट्रीय आपत्ती’ ही पुस्तिका भेट देऊन पारंपरिक मच्छीमारांना भेडसावणारा प्रश्न मांडण्यात आला. ‘मत्स्य दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या राज्यातील सागरी मच्छीमारांना दिलासा देताना २००४ आणि २००८ मध्ये तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मत्स्य पकेज दिले होते याची आठवण मच्छीमारांनी केली असता शरद पवार म्हणाले, तेव्हा केंद्रात मीच तुमचा मंत्री होतो.
विकास अध्ययन केंद्र मुंबई या संस्थेचे संचालक सुरेश शेळके आणि कार्यक्रम समन्वयक रेणुका कड यांच्यासमवेत पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने आज शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. यावेळी हवामानातील बदल, अवेळी पडणारा पाऊस आणि एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या पर्ससीननेटच्या मासेमारीमुळे मत्स्यदुष्काळाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पारंपरिक मच्छीमारांना सावरण्यासाठी सशक्त असा प्रस्ताव सादर करा. तुमच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे शरद पवार यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले.
अनधिकृत पर्ससीन नेट मासेमारीविरोधात आंदोलन करणाऱ्या मच्छीमारांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मच्छीमारांनी केली असता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्ह्यांसंदर्भात सर्व माहिती आपणास सादर करा. आपल्या विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.