तुम्ही १५ वर्षांत चार पक्ष बदललेत, निष्ठेच्या बाता मारू नका – शिवाजीराव आढळराव

0
97

शिरुर, दि. २4 (पीसीबी) – महायुतीतील शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील हे यावेळी शिरुर लोकसभेला अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार असणार आहेत.त्यासाठी ते येत्या मंगळवारी (ता.२६) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ही संधी साधून त्यांना या चौथ्या पक्ष प्रवेशाच्या शुभेच्छा त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी, शिरुरचे खासदार आणि तेथील आघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी देत नुकताच (ता.२१ )चिमटा काढला.त्याला आढळऱावांनी जशास तसे उत्तर काल दिले.

शिरुरची निवडणूक ही आढळराव विरुद्ध कोल्हे नाही, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूक उड्या अशी होणार आहे, असा टोलाही कोल्हेंनी खेड तालुक्याचा दौरा केल्यानंतर गेल्या गुरुवारी आढळरावांना लगावला होता. त्याची तशीच परतफेड दर पाच वर्षानी पक्ष बदलणाऱ्यांनी निष्ठेच्या बाता मारू नयेत, असे प्रत्युत्तर देत आढळरावांनी आता काल केली. मी गेली वीस वर्षे एकाच पक्षात राहिलो,पण, तुम्ही गेल्या १५ वर्षात संधी साधण्यासाठी विचार बदलीत मनसे,शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी असे चार पक्ष बदलले, असा घणाघात आढळरावांनी कोल्हेंवर केला. चार वेळा पक्ष बदलला,तरी चालेल, पण राजकीय स्वार्थ महत्वाचा,अशी चपराक त्यांनी लाचार पोरगा हिणवत कोल्हेंना लगावली.

संधी साधण्यासाठी विचार बदलत ज्यांनी पक्ष बदलले त्यांनी निष्ठेच्या बाता मारू नयेत,असा खरपूस समाचार कोल्हेंच्या टीकेवर आढळरावांनी घेतला.संधीसाधू आणि गायब खासदार अशी संभावना करीत त्यांनी कोल्हेंच्या जखमेवर मीठच चोळले. निवडून आल्यानंतर कोल्हे हे मतदारसंघात फिरकले नाहीत, असा आरोप मतदारांनीही केला आहे. हाच प्रचाराचा मोठा मुद्दा ठरणार आहे. त्यावरून आढळरावांनी बोचरी टीका केली. ऑन ड्युटी २४ तास या मराठी सिनेमात कोल्हेनी काम केले आहे. तो संदर्भ पकडून त्या चित्रपटातील कोल्हेंच्या महाराष्ट्र पोलिस दलातील शीख पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेचे छायाचित्र टाकत कोल्हे हे ऑन ड्युटी २४ तास फक्त सिनेमात असतात, असा हल्लाबोल आढळरावांनी केला. .तर, त्याशेजारी आपला गावभेटीचा फोटो देत सदैव जनतेमध्ये म्हणत फरक स्पष्ट आहे, असा टोला त्यांनी लगावला.

२००९ ला मनसे, २०१४ ला शिवसेना, २०१९ला राष्ट्रवादी आणि आता २०२४ ला शरद पवार राष्ट्रवादी म्हणजे स्वार्थासाठी दर पाच वर्षानी तुम्ही पक्ष बदलणार आणि गेली वीस वर्षे एकाच पक्षात राहून १५ वर्षे सलग खासदारकी भूषवली त्याला तुम्ही तत्वज्ञान सांगणार का असा सवाल आढळरावांनी कोल्हेंना केला. ज्या अजित पवारांनी तुम्हाला खासदार केले त्यांच्याशी गद्दारी करून तुम्ही दुसऱ्यांना निष्ठा शिकविणार हे म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वत, मात्र कोरडे पाषाण असं आहे, अशी सणसणीत चपराक त्यांनी लगावली.

गेली पाच वर्षे कोल्हे-आढळरावांत आरोप,प्रत्यारोप सुरु आहेत. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्ष बदलावरून त्यांच्यात पुन्हा हा कलगीतुरा आताच रंगला आहे. प्रत्यक्ष प्रचार सुरु झाल्यावर तो काय टोक गाठेल, याचा अंदाज यावरून येत आहे. गतवेळचेच हे प्रतिस्पर्धी पुन्हा समोरासमोर येणार असल्याने त्यांच्या आरोप, प्रत्यारोपाला मोठी धार येणार आहे. त्यात ही जागा शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. ते ही प्रचारात उतरणार आहेत. परिणामी ही लढत राज्यात लक्षवेधी होणार आहे.