तुमचे अश्रू खरे असतील तर बाळासाहेबांच्या अटकेबद्दल माफी मागा – संजय राऊत

0
373

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली ईडीची कारवाई ही राजकीय सूडातून करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेनेही आपल्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेची आठवण करून दिली. यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं. यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. अजित पवार यांचे अश्रू खरे असतील तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेबद्दल माफी मागावी, असं ते म्हणाले.

बाळासाहेबांना करण्यात आलेल्या अटकेदरम्यान आम्ही इतक्या टोकाचे राजकारण न करण्याची विनंती केली होती परंतु आमच्या मताला तेव्हा किंमत नव्हती, असं अजित पवार कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. बाळासाहेंबांच्या अटकेच्या त्यांच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे. बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. बाळासाहेबांना अटक ही चुक होती हे कळायला इतकी वर्ष का लागली? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच अजित पवार यांचे अश्रू खरे असतील तर त्यांनी त्या अटकेबद्दल माफी मागावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

“अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. ते पाणी पाहून मला मगरीचे अश्रूच आठवले. तुम्ही शेती करणार म्हणालात, पाणी हवं असेल आणि पाणी संपल्यावर धरणापाशी गेलात आणि धरणात पाणी नसेल तर काय करणार? अजित पवार तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे तुमच्या कर्माने आलेलं आहे. तुमच्याकडे जेव्हा माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा. काय बोलला होतात ते विसरु नका.” असा टोला उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यादरम्यान लगावला होता.