आम्हीसुध्दा पळपुटे नाही, उलटा वार करणारच; उध्दव ठाकरेंचा राष्ट्रवादीला इशारा

0
520

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – ईडी, सीबीआयची भीती दाखवून भाजप-शिवसेना सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. मग १० वर्षांनंतर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा आदेश काढून तुम्ही सुडाचे राजकरण केले नव्हते का? असा सवाल करून तुम्ही आम्हाला टार्गेट करणार असाल, तर आम्हीसुध्दा पळपुटे नाही, उलटा वार करणारच, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिला.

भाजप–शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीच्या पिंपरी-चिंचवड शहरामधील उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपरीतील आंबेडकर चौकात आज (शुक्रवार) आयोजित जाहीर सभेत उध्दव ठाकरे बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, आमदार लक्ष्मण जगताप,आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख योगेश बाबर, गजानन चिंचवडे, अमित गोरखे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, ऊर्मिलाताई काळभोर, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, मिलिंद नार्वेकर आदी सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गोरगरीब जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे युती केली आहे. युतीमध्ये गद्दारी नाही. आम्ही एकदिलाने काम करत आहे. राज्यभरात महायुतीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेण्याची आवश्यकता नाही, असे निर्धास्तपणे सांगून आपलं ठरलंय, पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता’, अशीही घोषणा उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली. चिंचवडमधील बंडखोर उमेदवाराचा शिवसेनेशी काडीचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

काँग्रेस गळीतगात्र झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते पक्षाला लागलेली गळीत रोखण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे टीका कोणावर करायची हा प्रश्न पडला आहे. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद म्हणू लागले आहेत की, पक्षाला भविष्य राहिलेले नाही. तर महाराष्ट्रातील दुसरे नेते सुशिलकुमार शिंदे म्हणतात, आता काँग्रेस –राष्ट्रवादी थकली. यावर जनतेने काँग्रेसकडून कोणती अपेक्षा ठेवायची, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

मला कर्जमाफी मान्य नाही, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त करणार, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. झोपडपट्टी मुक्त करून नागरिकांना हक्काची घरे देणार, १० रूपयांत जेवणाची थाळी, १ रूपयांत आरोग्य चाचणी, १५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आदी योजना सत्ता आल्यानंतर राबविणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.