तीन लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचे घोडे अडले!

0
2242

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सुरू असलेला जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. नंदूरबार, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन लोकसभा मतदारसंघावरून जागा वाटपाचे घोडे अडले आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपाची बोलणी अद्यापही सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १५ जानेवारीला दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून, या तीनही मतदारसंघाबाबत पुन्हा चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नंदूरबार लोकसभा मतदारसंघ मागितला आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जोरदार मागणी होत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा अडसर ठरू लागला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांच्यासाठी अहमदनगरची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे.

परंतु, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यास जोरदार विरोध करत आहेत. काँग्रेसकडे असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तीव्र इच्छुक आहेत. त्यामुळे अहमदनगर, औरंगाबाद आणि नंदूरबार या तीन लोकसभा मतदारसंघावरून आघाडीचे जागा वाटप अडले. येत्या १५ जानेवारील दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.