तळेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या पुनरुज्जीवनाच्या कामास सुरुवात

0
271

मावळ, दि.२६ (पीसीबी) : मावळ मधील तळेगाव दाभाडे मध्ये असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या स्मृती जतन करणाऱ्या निवासस्थानाचे संविधान पूजन करून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाचा शुभारंभ (शुक्रवारी) करण्यात आला. या ऐतिहासिक वास्तूचे त्यांच्या स्मारकात रुपांतर होत आहे. हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी उर्जास्रोत ठरेल, असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यक्रमाच्या वेळी बोलताना व्यक्त केला

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका संगीता शेळके, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्ष ॲड. रंजना भोसले, उपाध्यक्ष एल.डी.कांबळे, सचिव किसन थुल, सहदेव डोंबे, दिनेश गवई, संजय गायकवाड, देवानंद बनसोडे, तुकाराम मोरे, आनंद वंजारी, रोहिणी ओव्हाळ, माधुरी थूल, गंगाधर सोनवणे आदी उपस्थित होते. या पवित्र ऐतिहासिक वास्तूची दुरुस्ती, सुशोभीकरण, पुनरुज्जीवन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडून १ कोटी ११ लाख ७६ हजार रुपये निधी मिळाला आहे. आमदार शेळके यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.