तब्बल ३४ लाख कोंबड्यांची कत्तल; कोरोना बरोबर या देशात ‘बर्डफ्लू’ चा मोठा संसर्ग झाल्याने सरकराने घेतला निर्णय

0
379

टोकियो, दि.२६ (पीसीबी) – जपानमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आता जपानने ११ लाख कोंबड्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील अनेक भागांमध्ये बर्ड फ्लू एच फाइव्हचा प्रसार झाला आहे. हा विषाणू असून पसरु नये म्हणून जपान सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. हा जपानमधला सर्वात मोठा विस्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बर्ड फ्लू रोखण्यासाठी जपान सरकारे आजवर ३४ लाख कोंबड्यांची कततल केली आहे, असे सांगण्यात आले.

जगभरामध्ये करोनाच्या नव्या विषाणूची चर्चा असतानाच जपानमध्ये मात्र बर्ड फ्लूने डोकं वर काढलं आहे. बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता जपानमधील चीबा प्रांतामध्ये १० लाख कोंबड्यांना मारलं जाणार आहे. चीबा हा जपानमधील १३ वा असा प्रांत आहे जिथे एच फाइव्ह हा बर्ड फ्लू वेगाने पसरला आहे.

बर्ड फ्लूचा प्रसार थांबवण्यासाठी जपानने ११ लाख ६० हजार कोंबड्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील अधिकाऱ्यांनी चीबामधील १० किमीपर्यंतचा परिसर क्वारंटाइन केला असून या ठिकाणी कोंबड्या आणि अंडी न पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चीबा प्रांताप्रमाणेच कगवा, फुकुओका, हयोगो, मियाजाकी, हिरोशिमा, नारा, ओइता, वकायमा, शिगा, तोकुशिमा आणि कोचि या प्रांतांमध्येही बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जपानमध्ये ३४ लाख कोंबड्यांना संपवण्यात आलं आहे.

केवळच जपानच नाही तर मागील काही महिन्यांमध्ये अशाप्रकारे ब्रिटन, उत्तर जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्येही अशाच प्रकारे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला होता. संसर्ग झालेल्या कोंबडीची अंडी किंवा मांस खाल्ल्यास बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. तसेच बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव हा एका प्राण्याकडून दुसऱ्याकडे होत असला तरी हा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामधून करोनासारखी परिस्थिती निर्माण होईल या यासंदर्भात जगभरातील तज्ज्ञ मंडळी संभ्रमात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही करोनाप्रमाणेच आशिया खंडामध्ये आणि युरोपमध्ये प्रादुर्भाव होत असलेल्या बर्ड फ्लू विषाणूचा स्ट्रेन वेगळा आहे. जंगलातील पक्षांमधून पोल्ट्रीमधील पक्षांमध्ये याचा प्रादुर्भाव झाल्याशी शक्यता व्यक्त केली जातेय.

जपानमधील पोल्ट्रींमधील कोंबड्यांच्या एकूण संख्येपैकी एक चतुर्थांश कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या कोंबड्या संपवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीय. सध्या या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असतानाच त्यात आता बर्ड फ्लूचा प्रादुर्भावही होऊ लागल्याने चिंता आणखीन वाढली आहे. जपानमध्ये आतापर्यंत करोनाचे दोन लाख तीन हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. जपानमध्ये कोरोनामुळे दोन हजार ९०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगभरामध्ये कोरोनामुळे १७ लाख ३९ हजारांहून अधिक जण दगावले आहेत. त्यातच आता बर्ड फ्लूच्या संकटाची भर पडल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.