……तर पुन्हा हातात बॅट घेणार नाही – विराट कोहली

0
2468

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत करत इतिहासाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या भूमित कसोटी मालिका जिंकणारा विराट पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. यानंतर विराटचा भारतीय संघ शनिवारपासून ऑस्ट्रेलियाशी ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अनेक माजी खेळाडू स्थानिक टी-२० लीगमध्ये खेळत आहेत. मात्र आपल्या निवृत्तीनंतर अशाप्रकारे कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्याचा आपला विचार नसल्याचे कोहलीने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर विराट ऑस्ट्रेलियाच्या बिगबॅश लीगमध्ये खेळेल का असा प्रश्न विचारला असता विराट म्हणाला, “भविष्यात काय होणार आहे यावर मला आता बोलायला आवडत नाही. माझ्याबद्दल बोलायचे झाले तर मी प्रचंड क्रिकेट खेळलो आहे. निवृत्तीनंतर मी काय करेन हे आता मला सांगता येणार नाही, पण निवृत्तीनंतर मी पुन्हा बॅट हातात घेईन असे मला वाटत नाही. ज्या क्षणी मी निवृत्त होईन तो माझ्या कारकिर्दीचा अखेरचा दिवस असेल, पुन्हा मी क्रिकेटमध्ये येणार नाही.”