…तर निवडणूक आयोग राज ठाकरेंच्या सभाबाबत हस्तक्षेप करू शकत नाही – नीला सत्यनारायण  

0
653

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  प्रचारसभांचा खर्च पक्ष करत असतात. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी नसेल, तर त्यात निवडणूक आयोग काहीही हस्तक्षेप करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

ज्या राजकीय धोरणांसाठी सभा घेतली जाईल त्या धोरणांशी संबंधीत इतर पक्ष आपापसात हा खर्च समझौता करुन वाटून देखील  घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत न उतरलेला व्यक्ती, पक्ष स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सभा घेऊ शकतात, अशी माहिती नीला सत्यनारायण यांनी दिली. भाजपकडून मनसेच्या सभेच्या खर्चाची चौकशी करा अशी मागणी  केली जात आहे. यावर त्या म्हणाल्या की,  तक्रार नेमकी कोणत्या मुद्द्यावर करायची हे आधी त्यांना ठरवावे लागेल.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच  गोची  झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा राहिला आहे.