‘तुम्ही ठरवलंय’, मी पण ध्यानात ठेवलंय; शरद पवारांचा सतेज पाटलांना टोला

0
712

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – कोल्हापुरात येताना मी ‘आम्ही ठरवलंय’ अशी जाहिरात पाहिली. काय ठरवलंय म्हणून मी विचारले, तर मला सांगण्यात आले की आमच्या एका भाऊबंदाने ठरवलंय. ठीक आहे ठरवा, लक्षात ठेवा मी पण ध्यानात ठेवलंय, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सतेज पाटील यांना लगावला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार  राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ पेठ वडगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.  या सभेत पवार बोलत होते.

दरम्यान, सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रचार सुरू केला आहे. त्यांनी आमचे आता ठरलंय, असे म्हणत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा उघडपणे प्रचार सुरू केला आहे. यावर शरद पवारांनी टोला लगावला आहे.

पंचगंगेचे पाणी ज्यांनी प्यायले असेल, कोल्हापूरच्या मातीतील अन्न ज्यांनी खाल्ले असेल, ते अशा छोट्या गोष्टींसाठी संकुचित विचार करून दुसऱ्या  मार्गाला जाणार नाहीत, अशा शब्दांत पवार यांनी  सतेज पाटील यांचे नाव न घेता निशाणा साधला.