तरुणीचे रौद्ररुप: भररस्त्यातच तरुणाच्या गळ्यावर केले चाकूने सपासप वार

0
3642

चंद्रपूर, दि. १८ (पीसीबी) – तरुणीने एका तरुणावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना सोमवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास नागभीड येथील रस्त्यावर घडली.

किशोर पाथाडे (रा. ता. नागभीड, गाव चिंचोली) असे चाकूचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागभीड पोलिसांनी १८ वर्षीय तरुणीला (रा. ता. ब्रम्हपुरी, गाव हळदी) अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समोवारी रात्रीच्या सुमारास नागभीड येथील रेस्ट हाऊसच्या मुख्य रस्त्यालगत एक तरुणी चाकूने तरुणाच्या गळ्यावर सपासप वार करत होती. बघता बघता तिथे गर्दी जमली. मात्र कोणीही या तरुणीजवळचा चाकू हिसकावण्याची हिंमत करू शकले नाही. तरुण रक्तबंबाळ झाला होता. जवळपास अर्धा तास हा थरार सुरु होता. काही सतर्क नागरिकांनी घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणीला ताब्यात घेतले. झटापटीत तरुणी देखील जखमी झाली होती. किशोर याची स्थिती गंभीर असून त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. तर तरुणीला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागभीड पोलिसांनी तरुणीर विरोधात भादंवि कलम ३६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान, प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.