काँग्रेस आमदार नसीम खानवर मनसे पदाधिकाऱ्यांकडून पैशांची उधळण

0
797

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – चांदिवली भागात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात मुंबईतील काँग्रेस आमदार आणि माजी पालकमंत्री नसीम खान यांच्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे उधळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. नसीम खान हे चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणून आले  आहेत.  

मुंबईतील चांदिवली भागात हिमालय मित्र मंडळात सोमवारी (दि.१७) रात्री हा प्रकार घडल्याचे समजते. पैसे उडवले जात असताना नसीम खानही आनंदाने पाहत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारावर टीका केली जात आहे.

दरम्यान, नसीम खान यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे. मी भानुशाली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी स्वागत करताना पैसे उडवण्यात आले, असे नसीम खान यांनी म्हटले आहे. आपण पैसे उडवण्यापासून रोखल्याचा दावाही नसीम खान यांनी केला आहे. नसीम खान यांच्यावर पैसे उधळणारी व्यक्ती मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशाली आहेत. २०१२ मध्ये भानुशाली यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती.