ठाकरे सरकार स्थिर – शरद पवार

0
328

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : राज्यामध्ये उध्दव ठाकरे सरकार स्थिर आहे. त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठिशी मजबूत उभे आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सद्याच्या राजकीय घडजामोडींवर पवार यांचे विधान महत्वाचे समजले जाते.

ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. या कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं, यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे.

राज्यपालांच्या भेटीसंदर्भात ते म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून एकदाही त्यांना भेटलो नव्हतो. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असं राज्यपाल काल म्हणाले, असंही पवार यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नेहमी आढावा घेतो. नेहमी स्मारकावर भेटतो. काल मीच मातोश्रीला येतो असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच मातोश्रीवर गेलो होतो. यावेळी कोरोना बाबत आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली. कुठे किती रुग्ण आहेत, पावसाळ्यात काय काळजी घ्यायची? रुग्ण संख्या वाढते आहे यावर चर्चा झाली, असंही पवार म्हणाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींसह इतर गप्पा झाल्या असंही ते म्हणाले. सध्या राजकारणाचा विषय नाही. या काळात कोण राजकीय बोलणार? असंही शरद पवार म्हणाले.