टोल नाक्याजवळ एका नवजात बालिकेला फेकुन देत मातेचे पलायन

0
457

बीड, दि.२९ (पीसीबी) –  बीड तालुक्यातील कपिलधारवाडीत पंधरा दिवसांपूर्वीच तीन दिवसांच्या मुलीला काटेरी झुडपात फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच गेवराई पाडळिशगी येथील टोल नाक्याजवळ एका महिन्याच्या मुलीला फेकून देत मातेने पलायन केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. पोलिसांनी बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पाडळिशगी येथील टोल नाक्याजवळ मंगळवारी पहाटे नवजात बालिका आढळून आली. तेथील कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्याठिकाणी कोणीच दिसून आले नाही. त्यामुळे गेवराई पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आयआरबीच्या रुग्णवाहिकेतून चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नवजात बालिका एक महिन्याची आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नवजात बालिकेला रस्त्यावर फेकून दिल्यानंतर फरार झालेल्या मातेचा शोध घेण्यात येत असून प्रशासनाने टोल नाका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. शासन आणि सामाजिक संघटना मुलगी वाचवा असा संदेश देत असले तरी वंशाला दिवाच हवा ही मानसिकता बदलायला तयार नसल्याचेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.