टोकियो ऑलिंपिक माझ्यासाठी संस्मरणीय – मीराबाई

0
218

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – ती आली…तिने पाहिले आणि तीन जिंकली हे चित्र टोकियोत होते. पण, इकडे भारतात आज वेगळेच चित्र दिसले. तिने आल्याचे छायाचित्र ट्विट केले आणि ती आल्याचे कळाले. होय, मीराबाई चानू. ऑलिंपिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टिंग खेळाडू आज रुपेरी यश घेऊन मायदेशी परतली.

मायदेशात विमानतळावर उतरल्यावर तिने प्रशिक्षक विजय शर्मा यांच्यासोबतचे छायाचित्र ट्विट केले. अर्थात, हे सहाजिक होते. करोनाच्या मर्यादा असल्यामुळे तिचे जंगी स्वागत होऊ शकले नाही. त्यामुळे तिच्या ट्विटनंतरच ती मायदेशी परतल्याचे समजले. दिल्ली एअरपोर्ट अधिकाऱ्यांनीच तिचे स्वागत केले. त्या स्वागतानेही ती हरखून गेली होती.

तिच्या स्वागतासाठी चाहते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले, तरी तिच्या मायदेशी परतल्यावर तिने ट्विट केलेल्या छायाचित्रांवर चाहत्यांच्या उद्या पडला. शुभेच्छा संदेशाने तिचे ट्विटर अकाऊंट ओसंडून वाहू लागले.

मायदेशी परतल्यावर तिने सर्व प्रथम टोकियो ऑलिंपिक माझ्यासाठी विशेष संस्मरणीय असेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक खेळाडू म्हणून ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. इथपर्यंत पोचण्यासाठी मी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. देशासाठी रौप्यपदक मिळाल्यावर अशा त्यागाचे महत्व कळते.मी खूप आनंदी आहे, असेही ती म्हणाली.

मायदेशी परतल्यावर तिने चाहते आणि देशवासियांना धन्यवाद दिले. तुमच्या प्रोत्सहनामुळेच मी इथपर्यंत पोचू शकले. खरंच. स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद मला झाला आहे. एक भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही तिने सांगितले.

टोकियोत आल्यापासून माझ्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा होता. सरस कामगिरीची अपेक्षा होतीच. पदकाचीही खात्री होती. आता सुवर्णपदक मिळवू शकले नाही, याची खंत राहिल. पण, शेवटी ऑलिंपिक पदक जिंकले याचा आनंद काही औरच असतो. मी खूप समाधानी आहे. मी हे पदक देशवासियांनाच अर्पण करते. ते आहेत, म्हणून मी आहे, असेही तिने सांगितले.