टीसीएसच्या १०० कर्मचाऱ्यांचा पगार एक कोटींहून जास्त

0
458

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील (टीसीएस) १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचं वार्षिक वेतन एक कोटींहून अधिक आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने एकत्रित केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ‘ईटी’च्या आकडेवारीनुसार, २०१६-१७ या आर्थिक वर्षात टीसीएसमध्ये ९१ कर्मचारी कोट्यधीश होते. २०१८-१९ या वर्षात हा आकडा शतक ओलांडून १०३वर पोहोचला आहे. टीसीएसमधील १०३ कोट्यधीश कर्मचाऱ्यांमध्ये केवळ भारतातील कर्मचारी आहेत. भारताबाहेरील कोणत्याही कर्मचाऱ्याचा यात समावेश नाही. तसंच, कंपनीचे सीईओ राजेश गोपीनाथन, सीओओ एन. जी. सुब्रमण्यम यांचे नावही या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, कोट्यधीश कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कर्मचाऱ्यांनी याच कंपनीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

टीसीएस लाइफ सायन्सेस, हेल्थकेअर अँड पब्लिक सर्व्हिसेसचे (बिझनेस) प्रमुख देबाशिष घोष यांना दरवर्षी ४.७ कोटी मिळतात. बिझनेस आणि टेक्नॉलजी सर्व्हिसेसचे प्रमुख कृष्णन रामानुजम यांचे वार्षिक उत्पन्न ४.१ कोटी रुपये आहे. कंपनीच्या बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा व्यवसायाचे प्रमुख कृथिवासन यांना ४.३ कोटी उत्पन्न मिळते. कंपनीचे उपाध्यक्ष (वित्त विभाग) बरिंद्र सन्याल यांनाही १ कोटींहून अधिक रकमेचं पॅकेज मिळालं आहे. ७२ वर्षीय सन्याल हे कंपनीतील सर्वात जुने कर्मचारी आहेत. कोट्यवधीच्या या उत्पन्नात वेतन, भत्ते, रोख प्रोत्साहन भत्ता, पीएफ, निवृत्तीवेतन व इतर रकमेचा समावेश आहे. टीसीएसच्या वार्षिक अहवालात याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली जात नाही. याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया देण्यास कंपनीने नकार दिला आहे.

आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, ‘आर्थिक आघाडीवरील ‘टीसीएस’चे यश हे कंपनीतील वरिष्ठ नेतृत्वामुळे आहे. जुन्या व अनुभवी कर्मचाऱ्यांना कंपनीशी जोडून ठेवण्याचे उत्तम कसब कंपनीच्या नेतृत्वाकडे आहे. जुन्या कर्मचाऱ्यांना योग्य वेळी नेतृत्व करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांना कंपनी सोडून जाण्याची गरज भासत नाही.’