टिकटॉक बंदीचा निर्णय दिखाऊ, तृणमूल खासदार नुसरत जहाँ ची मुक्ताफळे

0
244

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) : टिकटॉक बॅन केल्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया समोर येत आहेत. अशातच तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी टिकटॉकसह सरकारने 59 चिनी अॅपवर आणलेला बंदीचा निर्णय कसलाही विचार न करता घेतल्याचं सांगितलं आहे. नुसरत जहाँ यासंदर्भात बोलताना म्हणाल्या की, ‘सरकारने ज्या चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. त्या अॅप्ससाठी त्यांनी भारतीय पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. कारण या अॅप्समुळे अनेक लोकांचा उदरनिर्वाह होत होता. दरम्यान, अभिनेत्री आणि खासदार असलेल्या नुसरत जहाँ यांचे टिकटॉकवर अनेक फॉलोअर्स आहेत. ‘चिनी अॅप्सवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे लोकांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, जसं नोटबंदीमुळे झालं होतं’, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणाही साधला आहे.

नुसरत जहाँ बोलताना म्हणाल्या की, ‘टिकटॉक माझ्यासाठी माझे चाहते आणि प्रेक्षक यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच आहे. जर बंदीचा निर्णय राष्ट्राच्या हितासाठी घेण्यात आला असेल, तर मी सरकारच्या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन करते. परंतु, केंद्र सरकारचा हा निर्णय दिखावा असून कोणताही विचार न करता घेण्यात आलेला निर्णय आहे.’