टाळ, मृदुंग व अभंगवाणीच्या भक्तिमय वातावरणात झाली उच्चशिक्षित वधू वराची एन्ट्री

0
286

वडगाव-मावळ,दि.०५(पीसीबी) – वडगाव मावळ येथील एका उच्चशिक्षित वधू वराच्या लग्नात टाळ, मृदुंग व अभंगवाणीच्या तालावर अगदी भक्तीमय वातावरणात वधूवरांची एंट्री झाली आणि उपस्थित वऱ्हाडीही भक्तिरसात न्हाहून गेले. मोहितेवाडी येथील वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या मालपोटे कुटुंबाने यामाध्यमातून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

बीएससी केमिस्ट्री पदवीप्राप्त असलेला वर श्याम दत्तात्रय मालपोटे व बी.एस.सी.बायोटेक पदवीप्राप्त असलेली वधु स्वाती घनश्याम बनकर परिवारातील हा आगळावेगळा विवाह सोहळा विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले सर्व नियम पाळत डामडौल ऐवजी भक्तिमय वातावरणात वडगाव मावळ येथील द्वारकाधीश मंगल कार्यालयात साजरा झाला. नवरदेव श्याम यांच्या कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा असून वडील दत्तात्रय मालपोटे हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहेत तर चुलते संतोष मालपोटे हेही उत्कृष्ट गायक आहेत. परिसरात होणारे अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन भजन आदी कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे हा वारसा जपण्याच्या हेतूने त्यांनी मुलाच्या लग्नसोहळ्यातही संप्रदायाचा वारसा जपण्याचा निश्चय केला होता.

यावेळी लग्नसमारंभ प्रसंगी विवाहमंचावर हरिपाठ सुरू होता, वधू – वर विवाहमंचावर येताना त्यांच्यासोबत श्री विठ्ठल व संत तुकोबारायांची वेशभूषा केलेले तसेच पुढे भगव्या पताका हातात घेऊन चालणारे बालवारकरी, टाळकरी सहभागी झाले होते. विवाहमंचावर येण्यापूर्वी वधू – वराच्या हस्ते समोर मांडलेल्या विणा व मृदुंगाची पूजा करण्यात आली, त्यानंतर हा विवाह पार पडला.