टाटा एअरक्राफ्ट प्रकल्प साठी नितीन गडकरी यांनीसुध्दा पत्र दिले होते

0
176

नागपूर, दि. २८ (पीसीबी) – महाराष्ट्राचा एक एक प्रकल्प केवळ गुजराथमधील भाजपची सत्ता वाचविण्यासाठीच पळवून नेला जात असल्याचे आता सिध्द होत आहे. प्रकल्प नागपूरमध्येच व्हावा यासाठी सर्व तयारी केली होती, पण आयत्यावेळी तो बडोद्याला नेण्यात आला. या मुद्यावर आता राज्यातील शिंदे-फडणवीस यांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. शिवसेना (ठाकरे) , राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सर्व विरोधकांनी मोदी-शाह यांच्याकडे बोट दाखवत टीकेची झोड उठवली आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. याआधी हा प्रकल्प नागपूरमध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र, हा प्रकल्प गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, मंत्री नितिन गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. नागपूरला टाटा समुहाचं हब बनवण्याची विनंती करणारे पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना लिहिलं आहे.

गडकरी यांनी काय म्हटलं आहे पत्रात?
टाटा समुहाच्या विविध उद्योग आणि व्यापाराच्या अनुषंगाने नागपूरच्या मिहानमध्ये एसईझेड आणि नॉन एसईझेड अशा दोन्ही प्रकारचे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या विविध उद्योगांसाठी मोठे गोदाम या ठिकाणी तयार करता येणार आहे. नागपूरच्या मिहानमध्ये एअर इंडियाचे विमानांसाठीचे एमआरओ असून टाटा समूह भविष्यातील व्यापार विस्ताराच्या संधीकडे पाहून मिहानमध्ये आणखी एमआरओ उभारू शकतो. तसेच स्वत:च्या एअरलाईन्ससाठी आणि इतर एअरलाईन्ससाठी स्पेअर पार्टचे मोठे गोदाम उभारू शकतो, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे.