“झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे?”

0
312

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – आपल्या नेतृत्वासमोरील गंभीर आव्हानाला तोंड देत उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र केलं आहे. आज आणि उद्या मुलाखतं प्रसारीत होणार असल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. आज त्यातला एक भाग प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पाच महत्त्वाचे मुद्दे…एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून फारकत घेऊन आपली भूमिका वेगळी असल्याचे दाखवून दिले. ते जाताना अनेक आमदार घेऊन गेले. त्यानंतर पक्ष आमचा असून आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. त्यावर आधारीत संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे .

“कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला “
“मुळातच माझी ‘वर्षा’वर जाण्याची इच्छा होती का? याचं उत्तर सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ आता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून वाईट बोलतोय असं मुळीच नाही. ते एक वैभव आहे. मुख्यमंत्रीपदाचा आणि ‘वर्षा’चा मी अजिबात अनादर करणार नाही. ती एक वेगळी वैभवशाली वास्तू आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे एक वैभवशाली पद आहे, जबाबदारीचं पद आहे. त्याचा पूर्ण आदर ठेवून सांगतो, मी कधीच वैयक्तिक अशी स्वप्ने बघितली नव्हती. त्यावेळी जे घडलं ते आजच्या लोकांना ज्यांना आपण विश्वासघातकी म्हणू, त्यांना ते पूर्ण माहितेय की कसा पाठीत वार केला गेला आणि कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला होता,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“गुंगीत जरी विचारलं असतं ना तरी मी ‘मातोश्री’ हेच उत्तर दिलं असतं”
“जेव्हा माझी शस्त्रक्रिया झाली, खरं तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. तो अनुभव माझा वेगळा आहे. फार विचित्र अनुभवातून मी गेलोय. त्या वेळेला जेव्हा अॅनेस्थेशियामधून मला जागवले. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर अॅनेस्थेशियातून बाहेर पडताना मला डॉक्टरांनी विचारले की, सर कुठे जायचं? ‘मातोश्री’ की ‘वर्षा’? मी पटकन म्हटलं- मातोश्री! तेव्हा मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर, तुम्ही मला अॅनेस्थेशिया दिला तेव्हा गुंगीत जरी विचारलं असतं ना तरी मी ‘मातोश्री’ हेच उत्तर दिलं असतं,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.

“हेच आशीर्वाद शिवसेनेला बळ देतील”
“शिवसचं तरुण आणि युवांशी नातं शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे. मात्र एक आहे, अजूनही मोठय़ा संख्येने ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटताहेत. ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं आहे, ज्यांना आपण पहिल्या पिढीचे म्हणू. ज्यांनी शिवसेनेचा संघर्ष पाहिलाय. स्वतः संघर्ष केलाय. त्यांना शिवसेना म्हणजे काय ते नेमकं कळलेलं आहे. त्यांना शिवसेनेकडून काही मिळावं ही अपेक्षा नव्हती आणि आजही नाही. पण ते येऊन आशीर्वाद देताहेत.

“झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे?”
“सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसं उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. पण दुसऱया दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो. झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे? आता नवीन कोंब फुटायला लागले आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“माझे वडील का चोरताय? तुम्ही मर्द नाहीत”
“ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सुनावलं आहे.

” 2014 साली भाजपाने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं?”
“शिवसेनेचं राजकारण हिंदुत्व मजबूत होण्यासाठीच ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपाने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोपं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

“सडलेली पानं झडलीच पाहिजेत”
“मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पानगळ म्हणतो. त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काडय़ा राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत. त्यांना झडून जाऊ द्या,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात”
“खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात. म्हणजे नवी पालवी फुटेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“करोनातून आणि त्या संकटातून बाहेर पडलो याचा आनंद”
“गेल्या वर्षी जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा करोनाचा कहर होता. त्या करोनामध्ये जे काही करता येणं शक्य होतं ते मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि अभिमानाने सांगेन की, माझ्या राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून मी केलं. त्यावेळी लॉकडाऊन होतं; मंदिरे बंद होती; सणासुदींना बंदी होती. पण या वर्षी आपण पहिल्यांदाच पंढरपूरच्या वारीत कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीत आणि जल्लोषात ती पार पाडली. म्हणजेच पुन्हा एकदा सणासुदीला सुरुवात झाली आहे. आता दहीहंडी येईल, गणपती येतील, नवरात्र येईल, दिवाळी येईल. पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात उत्सव, उत्साह आणि आनंद याची सुरुवात झाली आहे. मध्यंतरी जणुकाही एक ‘पॉज’ बटण दाबलं गेलं होतं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण करोनातून आणि त्या संकटातून बाहेर पडलो. मला आनंद आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.