ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे निधन

0
394

बंगळुरू, दि. १० (पीसीबी) – अंतर्मुख करणारे नाट्यलेखन, संवेदनशील दिग्दर्शन व कसदार अभिनयामुळे भारतीय साहित्य व सांस्कृतिक वर्तुळावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे आज निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाड आजारपणाशी झुंज देत होते. बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी आज सकाळी सहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. कर्नाड यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कर्नाड यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान इथे झाला होता. बहुभाषिक व बहुपेढी व्यक्तिमत्त्व असलेल्या कर्नाड यांनी तब्बल चार दशके आपल्या रंगभूमी गाजवली. कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झाली. वेगळ्या धाटणीची व नवा दृष्टिकोन देणारी त्यांची नाटके सुजाण प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल १९९८ साली त्यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.