“जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच ठेवणार”

0
483

महाराष्ट्र,दि.१(पीसीबी) – जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच ठेवणार, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. राजमती ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी शेट्टी आणि नाशिकचे कृषी उद्योजक विलास शिंदे यांना श्रवणबेळगोळचे चारूकीर्ती महास्वामी यांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शेट्टी बोलत होते.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, माझ्या मिशीला खरकटे लागलेले नाही. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतच राहणार आहे. जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील. शेतमालाला दर मिळण्यासाठी केवळ रस्त्यावरचा संघर्ष उपयुक्त ठरत नाही, तर कायद्यातही सुधारणा करावी लागणार आहे. यासाठी मला २०२४ मध्ये लोकसभेत जायचे आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी हितापेक्षा व्यापारी हिताकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, शेतीबाबत काही धोरणे ठरवायची असल्याने पुन्हा लोकसभेत जाणे भाग असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. या प्रसंगी ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील, जयश्री पाटील, सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते.