जामखेडमध्ये रोहित पवार राम शिंदेंचे कार्यकर्ते भिडले; एकावर चाकू हल्ला

0
963

अहमदनगर, दि. २१ (पीसीबी) – जामखेड तालुक्यातील बांधखंडक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार व भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केला. दोन्ही गटातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनातून मतदार वाहतुकी करण्याच्या  कारणावरून ही हाणमारी झाल्याचे सांगितले जात आहे.

या हल्ल्यात भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे व हर्षवर्धन शंकर फुंदे (रा. बांधखडक) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये वाहनांमधून मतदारांची वाहतूक केली जात होती. मतदारांना गाडीतून नेण्याच्या वादातून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यातून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला. तसेच यावेळी एका वाहनाची तोडफोड करण्यात आली.