जवानांविषयीची बातमी नक्षलीपर्यंत कोणी पोहोचवली, हे देशद्रोही कोण होते? – शिवसेना

0
546

मुंबई, दि. २ (पीसीबी) – नक्षलविरोधी पथकातील जवानांची वाहतूक खासगी वाहनांमधून केली जात होती. तरीही जांभूरखेडा येथे नक्षल्यांनी खासगी वाहनातून जाणाऱ्या जवानांना लक्ष्य केले. जवानांविषयीची बातमी नक्षलीपर्यंत कोणी पोहोचवली, हे देशद्रोही कोण होते, असा सवाल शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. आधी पुलवामा आणि आता जांभूरखेडा हे दोन्ही हल्ले म्हणजे नक्षल्यांनी वर काढलेले डोके  आहे. ते आताच ठेचावे लागेल,  असेही अग्रलेखात म्हटले आहे.

आधी दंतेवाडा आणि आता जांभूरखेडा हे दोन्ही हल्ले म्हणजे नक्षल्यांनी वर काढलेले डोके आहे. ते आताच ठेचावे लागेल. कारण या डोक्यांमध्ये ‘जिहादी हवा’ भरण्याचेही उद्योग सुरू आहेत. नक्षल्यांच्या पोस्टर्सवर जम्मू–कश्मीर लिबरेशन फ्रंट आणि त्या संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याचे नाव हा या कनेक्शनचा पुरावा आहे. कश्मीरमध्ये दोन वर्षांत दोनशेच्या वर दहशतवाद्यांचा खात्मा करणारे आणि कश्मीर खोऱ्यातून ‘जैश–ए–मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे नामोनिशाण मिटविणारे केंद्रातील मोदी सरकार नक्षलवाद्यांचेही डोके ठेचण्यात यशस्वी होईल याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही.

नक्षलवाद्यांनी पुन्हा एक भयंकर हत्याकांड घडविले आहे. गडचिरोलीतील भूमी आमच्या शहीद जवानांच्या रक्ताने माखली आहे. ऐन महाराष्ट्र दिनीच नक्षल्यांनी राष्ट्रद्रोही डाव साधला आहे. जेमतेम तीन आठवडय़ांपूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडा भागात नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भाजप आमदारासह काही जवानांचा बळी घेतला होता. आता गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ बुधवारी तसाच स्फोट घडविला गेला. या स्फोटात 16 जवान हुतात्मा झाले. हे सर्व जवान ‘क्वीक रिस्पॉन्स टीम’चे म्हणजे ‘जलद प्रतिसाद पथका’चे होते. या हल्ल्याने नक्षली आव्हान किती कठीण आहे हेच दाखवून दिले आहे. तसेच नक्षलविरोधी कारवायांमधील कच्चे दुवे आणि उणिवा पुन्हा चव्हाटय़ावर आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नक्षल्यांना या पथकाची ‘बित्तंबातमी’ होती हे स्पष्ट झाले आहे, हे अत्यंत धोकादायक आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.