जळगाव डेंजर झोनमध्ये: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंचा दर सर्वात जास्त

0
1916

प्रतिनिधी दि. १४ जून (पीसीबी) : जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशभरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढू लागला आहे. महाराष्ट्रात आता एक लाखापेक्षा जास्त कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण अढळले आहेत. सुरुवातीला मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होत होता. परंतु आता महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात देखील कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. मागील ८ – १० दिवसात जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत. तसेच जळगाव मध्ये कोरोनामुळे मृत्युंचा दर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंचा दर तब्बल ७.३५ % इतका आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रात हा दर ४.१३ % आहे व कोरोणाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबईत हा दर केवळ ३.७२ % इतका आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा कोरोनाच्या डेंजर झोनमध्ये आला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २५ मार्च रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊन १ ची मुदत १४ एप्रिल रोजी संपत असतानाच पुन्हा लॉकडाऊन २ हा ३ मे पर्यंत लागू करण्यात आला होता. या काळात जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे केवळ १०० रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळू हळू वाढू लागली. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगावात कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार ६३३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण अढळले आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्याबाबत जळगाव मधील यंत्रणा किती बेफिकीर, निर्दयी झाली आहे त्याचे उदाहऱण नुकतेच समोर आले आहे. भुसावळच्या मालती नेहते या ८२ वर्षीय आजींची १ जून रोजी प्रकृती बिघडली होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, २ जून रोजी त्या रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने मालती नेहते यांचे नातू हर्षल नेहते यांना दिली. हर्षल नेहते यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. अखेर आठ दिवसांनंतर पोलिसांनी हर्षल नेहते यांना त्यांच्या आजीचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरुममध्ये सापडल्याची माहिती समोर आली. या घटनेची गंभीर दखल घेत शासनाने सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता, अधीक्षक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित केले.

जळगाव जिल्ह्यात १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंचा दर तब्बल ७.३५ % इतका आहे. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा मृत्यू दर दुप्पट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंचा दर ४.१३ % व मुंबईत हा दर केवळ ३.७२ % इतका आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा कोरोनाच्या डेंजर झोनमध्ये आला आहे. कोरोना रुग्णांचे वेळीच निदान न झाल्याने कोरोणाचा प्रसार जळगावात वाढू लागला आहे. १ जून रोजी जळगावात ७४८ कोरोना बाधित रुग्ण होते मात्र आता हा आकडा ८८५ ने वाढला आहे. सुरुवातीला जळगाव व भुसावळ शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता मात्र आता अमळनेर, चोपडा, यावल, बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर भडगाव व धरणगाव या तालुक्यांमध्ये सुद्धा कोरोनाचा संसर्ग होत आहे. १ जून पासून अनलॉक १ लागू झाला असून उद्योग व दुकारे उघडण्यासाठी सशर्त परवागी देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात फिझीकल डीस्टंसिंगचे पालन होताना दिसत नाही. प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.