जमशेदपूर-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

0
284
during match 69 of the 7th season of the Hero Indian Super League between Jamshedpur FC and Hyderabad FC held at the Tilak Maidan Stadium, Goa, India on the 24th January 2021 Photo by Faheem Hussain / Sportzpics for ISL

वास्को (गोवा), दि. 25 (पीसीबी) – हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात रविवारी पहिल्या लढतीत हैदराबाद एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. हैदराबाद बाद फेरीच्या शर्यतीत असून चौथे स्थान भक्कम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना काहीसा धक्का बसला.

वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. गोलशून्य बरोबरीची कोंडी अखेरपर्यंत सुटू शकली नाही. हैदराबादने याबरोबरच चौथे स्थान कायम राखले. त्यांची ही 13 सामन्यांत सहावी बरोबरी असून चार विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 18 गुण झाले. नॉर्थईस्ट युनायटेड (12 सामन्यांतून 15 गुण), तर चेन्नईयीन एफसी (13 सान्यांतून 15 गुण) या दोन संगांसह जमशेदपूरही त्यांचा पाठलाग करीत आहे.जमशेदपूरने दोन क्रमांक आगेकूच केली. 13 सामन्यांत त्यांची पाचवी बरोबरी असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिहीसह त्यांचे 14 गुण झाले. त्यांनी बेंगळुरू एफसीला (12 सामन्यांतून 13 गुण) मागे टाकले.

याशिवाय केरला ब्लास्टर्सला गुणांवर गाठत जमशेदपूरने सरस गोलफरकावर मागे टाकले.. जमशेदपूरचा गोलफरक उणे 4 (13-17), तर ब्लास्टर्सचा उणे 5 (17-22) असा आहे. मुंबई सिटी एफसी 12 सामन्यांतून नऊ विजयांसह 29 गुणांनी आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान दुसऱ्या क्रमांकावर असून 12 सामन्यांत सात विजयांसह 24 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. एफसी गोवा तिसऱ्या क्रमांकावर असून 13 सामन्यांत पाच विजयांसह त्यांचे 20 गुण आहेत.

सातव्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक सैमीनलेन डुंगल याने थ्रो-ईनवर चेंडू नियंत्रीत केला. त्याने हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्राला चकविले. त्याने बॉक्समध्ये तिलेल्या आप्रतिम क्रॉस पासवर आघाडी फळीतील नेरीयूस वॅल्सकीस वेळीच ताबा मिळवू शकला नाही. दोन मिनिटांनी हैदराबादचा स्ट्रायकर जोएल चायनेस याला आघाडी फळीतील सहकारी अरीडेन सँटाना याने पास दिला. चायनेसच्या प्रयत्नावर जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याने बचाव केला. त्याने चेंडू बाहेर घालविला. सामन्याच्या 21व्या मिनिटाला चायनेस याने मध्य फळीतील हालीचरण नर्झारी याला पास दिला. नर्झारीने मारलेला फटका रेहेनेश याने डावीकडे झेपावत अडविला.

उत्तरार्धात सुरवातीला 39व्या मिनिटाला जमशेदपूरच्या आघाडी फळीतील फारुख चौधरी याने केलेला प्रयत्न थोडक्यात चुकला. त्यानंतर तीनच मिनिटांनी 42व्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने डावीकडून मिळालेला कॉर्नर घेतला. त्याच्या चेंडूवर बचाव फळीतील स्टीफन इझे याने उडी घेत हेडिंग केले, पण हैदराबादचा बचावपटू आशिष राय याने ही चाल चपळाईने रोखली. दुसऱ्या सत्रात रायने चौधरीला पाडल्यामुळे जमशेदपूरला फ्री किक मिळाली. मॉनरॉयने बॉक्समध्ये मारलेला चेंडू हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने अडविला.

अखेरच्या टप्प्यात 63व्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक अलेक्झांड्रे लिमा याने चेंडूवर ताबा मिळविला, पण हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनैन्डीया याने आकाश मिश्राच्या साथीत त्याला रोखले. सामन्याच्या 78व्या मिनिटाला हैदराबादला मिळालेली फ्री कीक मध्यरक्षक हितेश शर्माने घेतली. त्याचा फटका स्टीफन इझेने हेडिंगवर थोपविला, पण चेंडू पेनल्टी क्षेत्रात सँटानाकडे गेला. सँटानाने रेहेनेशच्या डावीकडे चेंडू मारला, पण त्याचा फटका स्वैर होता. चार मिनिटे बाकी असताना चौधरीने डावीकडे कॉर्नर मिळविला. मॉनरॉयने तो घेतला, पण हैदराबाच्या बचाव फळीने आपले क्षेत्र सुरक्षित राखले.