“बोलीभाषेतून प्रमाणभाषेची निर्मिती !” – प्रा.डॉ. प्रतिमा इंगोले

0
328

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) “कोणत्याही प्रमाणभाषेची निर्मिती ही बोलीभाषेतूनच होते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ. प्रतिमा इंगोले यांनी रविवार, दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा यांनी भाषा पंधरवड्याचे औचित्य साधून आयोजित ‘कवितेकडून कवितेकडे!’ या उपक्रमांतर्गत ‘मराठी प्रमाणभाषेत बोलीभाषेचे स्थान’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात प्रा.डॉ. प्रतिमा इंगोले बोलत होत्या. साहित्यिक डॉ. रवींद्र तांबोळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन निंबाळकर आणि ज्योती निंबाळकर दांपत्य, प्रकाशक नितीन हिरवे, समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष शोभा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते डॉ. रवींद्र तांबोळी यांनी आपल्या मनोगतातून, “दुधामध्ये साखर मिसळावी तशी बोलीभाषा ही प्रमाणभाषेत विरघळलेली असते. संत-पंत-तंत काव्यामध्ये बोलीभाषेतील शब्द आढळतात. बोलीभाषेमुळे प्रमाणभाषा समृद्ध झाली आहे; म्हणून आपल्या परंपरा पाळून मराठीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता तिचा वापर करणे आवश्यक आहे!” असे विचार मांडले.

सामाजिक समरसतेच्या मानदंडांचे प्रतिमापूजन आणि गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रादेशिक बोलीतील स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. समरसता साहित्य परिषदेचे शाखा कार्यवाह सुहास घुमरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून, ‘मराठी बोलीभाषेतील शब्द प्रमाणभाषेमध्ये आवर्जून वापरले जावेत’ , अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी हिंदी भाषेमध्ये ‘ळ’ या वर्णाक्षराचा वापर करण्यात यावा यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणाऱ्या प्रकाश निर्मळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

निमंत्रितांच्या बोलीभाषा कविसंमेलनात मंगला पाटसकर यांनी बहिणाबाई चौधरी यांची “देव अजब गारोडी…” (खानदेशी), माधुरी विधाटे यांनी संध्या दिवकर रचित “आमचं हे बोलतान् लाडकं फुला…” (आगरी), नीलेश शेंबेकर यांनी “उभ्या उसात गं रान झालं गं बाई…” (चंदगडी), नीलेश म्हसाये लिखित “पातीतल्या पोरी…” (वऱ्हाडी), सुप्रिया लिमये यांनी “असा कास्तकार…” (झाडीपट्टी), अनिल आठलेकर यांची “फाटफटी उठानां…” (मालवणी), समृद्धी सुर्वे यांनी उदय नरसिंह म्हामरो लिखित “माझ्या हाताची पाच बोटा…” (कोंकणी), उज्ज्वला केळकर यांनी डी.के. शेख यांची “पैसे पडते…” (दखनी), रघुनाथ पाटील लिखित “सन आखाजीना उना…” (अहिराणी), वैशाली मोहिते यांनी “बाजीराव म्हणत्यात मला…” (नगरी) अशी निरनिराळ्या बोलीभाषांमधील विविध आशयाच्या अन् भिन्न भावभावनांचा परिपोष करणाऱ्या कवितांचे सुंदर सादरीकरण करीत उपस्थित रसिकांची मने जिंकून उत्स्फूर्त दाद मिळवली. अभिजित काळे यांनी सादर केलेल्या संस्कृत सुभाषिताने सुरू झालेल्या या काव्यमैफलीचा समारोप स्नेहा गावंडे यांच्या ‘कवितेवरील कवितेने’ करण्यात आला.
प्रा.डॉ. प्रतिमा इंगोले पुढे म्हणाल्या की, “गर्भावस्थेत भाषेचे संस्कार होत असल्याने बोलीभाषा ही आपल्या रक्तातच भिनलेली असते. त्यामुळे आपली विचारप्रक्रियादेखील बोलीभाषेतूनच चालते. निसर्गाच्या आविष्कारातून प्राकृतभाषा निर्माण झाली. त्यामुळे कोणत्याही शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतपेक्षा ‘गाथासप्तशती’ , ‘विवेकसिंधू’ , ‘लीळाचरित्र’ या प्राकृत भाषेतील प्रमाणग्रंथांमध्ये शोधायला हवी. तेराव्या शतकात पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या बोलीभाषेतून सध्याची प्रमाण मराठीभाषा निर्माण झालेली आहे!”
पंजाबराव मोंढे, सीताराम सुबंध, रामचंद्र प्रधान, सुरेश कंक, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. मंजिरी तिक्का यांनी कविसंमेलनाचे तर मानसी चिटणीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष शोभा जोशी यांनी आभार मानले.