जनता मोदींना पुन्हा बहुमत देणार नाही- मेघनाद देसाई

0
635

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले नेते आहेत, पण टीमला सोबत घेऊन जाणारे नेते नाहीत. मंत्रिमंडळाच्या जोरावर देश चालवण्याऐवजी गुजरातच्या धर्तीवर नोकरशहांच्या भरवशावर सरकार चालवण्याची त्यांनी चूक केली. त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त आश्वासनेही दिली. त्यामुळे लोक नाराज असून नाराज मतदार त्यांना पुन्हा बहुमत देणार नाहीत,’ असे मत मोदींचे प्रशंसक असलेले अर्थतज्ज्ञ मेघनाद देसाई यांनी व्यक्त केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मेघनाद देसाई यांनी हे स्पष्ट केले. ‘लोक मोदींवर नाराज आहेत. अच्छे दिन अजूनपर्यंत आली नसल्याची भावना त्यांच्यात आहे. मोदींकडे अनेक संधी होत्या. पण त्यांचा त्यांनी उपयोग केला नाही,’ असे सांगतानाच ‘टीमला सोबत घेऊन न जाणे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते,’ असे देसाई म्हणाले.

‘मोदी लोकनेते आहेत, पण टीम लीडर नाहीत. अरुण जेटली आणि सुषमा स्वराज वगळता त्यांच्या टीममध्ये कोणीही अनुभवी नाही. या उलट मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंह, शरद पवार आणि पी. चिदंबरम यांच्यासह कमीत कमी सहा अनुभवी नेते होते. विशेष म्हणजे हे सहाही लोक पंतप्रधानपदाच्या योग्यतेचे होते,’ असेही ते म्हणाले. ‘परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मतदारांकडे जावे लागेल, असे मोदींना कधी वाटले नसेल,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.