जगामध्ये भारत महिलांसाठी असुरक्षित देश; जया बच्चन यांचा राज्यसभेत हल्लाबोल

0
394

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – जगामध्ये भारत महिलांसाठी असुरक्षित देश बनत चालला आहे. त्यावर सरकारचे काय म्हणणं आहे?, असा संतप्त सवाल करून समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर आज (गुरूवार) राज्यसभेत जोरदार हल्ला चढवला.

राज्यसभेत कठुआ प्रकरणावर चर्चा सुरू असताना जया बच्चन यांनी सरकारला महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावरून धारेवर धरले. ‘तुम्ही मध्यप्रदेशच्या घटनांवर बोलता. पण कठुआवर का बोलत नाही?,’ असा सवाल जया बच्चन यांनी केला.

‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेले अत्याचाराचे आकडे आणि तुमचे आकडे वेगळे कसे?, असा सवालही त्यांनी बाल विकास राज्यमंत्री वीरेंद्र कुमार यांना केला. यावेळी विरोधकांनी बच्चन यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

दरम्यान, काँग्रेसच्या खासदार छाया वर्मा यांच्या महिलांच्या सुरक्षेवरील प्रश्नावर उत्तर देताना वीरेंद्र कुमार म्हणाले की, महिलांसाठीचे कायदे अध्यादेशाद्वारे कठोर करण्यात आले आहेत. पोलीस आणि कायदा सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी आहे. मध्यप्रदेशसारख्या इतर राज्यांनी त्यावर चांगले काम केल्याचे वीरेंद्र कुमार यांनी सांगितले.