चौथा उमेदवार निवडून आणणार – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

0
559

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : “ विधान परिषद निवडणुकित भाजपकडे चौथ्या जागेसाठी अपेक्षित संख्याबळ आहे. आरामात चौथा उमेदवार निवडून आणणार”, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने, या निवडणुकीला वेगळं महत्त्वं आहे. उद्धव ठाकरे यांना 27 मेपूर्वी विधीमंडळाच्या दोनपैकी एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे. राज्यपालांनी मंत्रिमंडळ शिफारस न स्वीकारता निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने 21 मे रोजी विधानपरिषदेतील रिक्त 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली.

आता या रिक्त 9 जागांपैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या तर 3 जागा भाजपच्या हमखास निवडून येतील, हे संख्याबळावरुन स्पष्ट होतं. मात्र एका जागेसाठी चुरस आहे. काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्याबाबत महाविकास आघाडी आज बैठक घेऊन रणनीती ठरवणार आहे. मात्र भाजपनेही चौथी जागा आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने उध्दव ठाकरे आणि विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कुणाचं संख्याबळ काय?
सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.