ईपीएफओने आपल्या निवृत्तिवेतनधारकांना दिले 764 कोटी रुपये

0
273

नवी दिल्ली , दि. ५ (पीसीबी) – ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या निवृत्तीवेतन योजनेत 65 लाख निवृत्तिवेतनधारक आहेत. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर देशभरात केलेल्या टाळेबंदीच्यामुळे निवृत्तिवेतनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून ईपीएफओच्या 135 क्षेत्रीय कार्यालयांनी एप्रिल 2020 च्या निवृत्तीवेतन देयकाची आगाऊ व्यवस्था केली होती. ईपीएफओ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सर्व अडचणींचा सामना करत भारतभरातील निवृत्तीवेतन वितरित करणाऱ्या बँकांच्या सर्व नोडल शाखांना 764 कोटी रुपये पाठविले.

सर्व बँक शाखांना निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात निवृत्तिवेतनाची रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड -19 संकटकाळात निवृत्तीवेतनधारकांना मदत करण्यासाठी ईपीएफओकडून या गरजेच्या वेळी निवृत्तिवेतनाचा वेळेवर पुरवठा करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे.