“चौकशी म्हणजे निव्वळ डोळ्यात धुळफेक; अधिकाऱ्याला निलंबित करा”

0
328

मुंबई,दि.९(पीसीबी) – चौकशीचे आदेश ही निव्वळ डोळ्यात धुळफेक आहे, अशी परखड प्रतिक्रिया प्रसिद्ध आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन आहे. असं असूनही लॉकडाऊनचा नियम धाब्यावर बसवून अमिताभ गुप्ता या आयपीएस अधिकाऱ्याने उद्योगपती कपिल वाधवान यांच्या कुटुंबीयांना प्रवास करण्यास मुभा असावी असं एक विशेष पत्र दिलं. त्यानंतर गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत आणि तात्पुरती कारवाई देखील केली आहे. मात्र चौकशीचे आदेश ही निव्वळ डोळ्यात धुळफेक आहे, अशी प्रतिक्रिया अशोक खेमका यांनी दिली आहे.

कोरोनाचा एवढा मोठा धोका असूनदेखील एका जबाबदार अधिकाऱ्याने असं पत्र देऊन नागरिकांच्या जीवाची खेळण्याचा प्रकार केला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली तसंच संतापाची लाट पसरली. यावर आयएएस खेमका यांनी परखड भाष्य करत या अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करा आणि नियम ८ नुसार तात्काळ आरोपपत्र दाखल करा, असं म्हटलं आहे.

दरम्यान रात्री १० वाजता हा सारा प्रकार महाराष्ट्रासमोर आल्यानंतर खळबळ माजली होती. सामान्यांना एक न्याय आणि आणि बड्या धेंड्यांना एक न्याय असं का असा सवाल लोक विचारू लागले होते. मात्र गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेत रात्री दोन वाजता ट्विट करून अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवल्याची कारवाई केली गेली आहे, असं सांगितलं.