चोरी करायला गेला आणि तिथेच झोपला पुढे जे झालं ते वाचून थक्क व्हाल ..

0
240

नवी मुंबई, दि. १३ (पीसीबी) – नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये सराईत गुन्हेगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनेश चव्हाण असं मृत आरोपीचे नाव असून घरफोडी, चोरीचे 7 गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल होते.चोरीसाठी घरात घुसलेला चोरटा त्याच ठिकाणी झोपी गेल्याने हाती लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. यावेळी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू घटनास्थळी झालेल्या मारहाणीत झाला की पोलिसांच्या मारहाणीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
दिनेश देवराज चव्हाण असे मृत पावलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तो कोपरखैरणे सेक्टर-5 परिसरात राहणारा आहे. त्याच्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री तो कोपरखैरणे सेक्टर 19 येथील एका घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. घराची खिडकी उघडून तो आतमध्ये शिरल्यानंतर घरातच एका कोपऱ्यात झोपला. मात्र पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घरातील व्यक्तींना जाग आली असता त्यांना खिडकी उघडी दिसली. यामुळे त्यांनी घरात पाहिले असता एका कोपऱ्यात दिनेश झोपलेल्या अवस्थेत दिसला. यामुळे घरातील व्यक्तींनी त्याला चोप देऊन चोर पकडल्याची माहिती कोपरखैरने पोलिसांना दिली.त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवले होते. मात्र काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने वाशीच्या पालिका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. त्याचा मृत्यू घटनास्थळी झालेल्या मारहाणीत झाला की पोलिसांच्या मारहाणीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त आणि सीआयडीचे अधिकारी उपस्थित होते.