पोस्टाने तक्रार दिलेली महिला पोलीस ठाण्यात पोहोचली, संजय राठोडांच्या अडचणी वाढणार?

0
220

यवतमाळ, दि. १३ (पीसीबी) – शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात पोस्टाने तक्रार देणारी महिला आज घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाली. घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रारदार महिला एका कारने कुटुंबासह दाखल झाली. याबाबत SIT ने महिलेचा जबाब नोंदवला. संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल.

एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात मंत्रिपद गमावलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली आहे. यवतमाळ पोलिसांकडे याबाबत पोस्टाने करण्यात आली आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार या महिलेने केली आहे.
संबंधित महिलेल्या आरोपांनंतर संजय राठोड यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. यावेळी त्यांनी माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी कोणीतरी जाणुनबुजून मला या सगळ्यामध्ये गोवत असल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर संजय राठोड यांनी स्वत:हून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
संजय राठोड यांनी आपल्याला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून धमक्या आल्याचे म्हटले होते. त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सायबर सेलचीही मदत घेतली जाणार आहे. महिलेनं केलेली तक्रार आणि संजय राठोड यांना मोबाईलवर आलेल्या एसएमएसची चौकशी होईल. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.