चिदंबरम पिता-पुत्राना मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

0
447

नवी दिल्ली, दि.५ (पीसीबी) – देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना दिल्लीतील विशेष कोर्टाने गुरुवारी (दि.५) एअरसेल-मॅक्सीस प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला. ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास संस्थांच्या खटल्यांमधून जामीन मंजूर करण्यात आल्याने दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पी. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत आहेत.

दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालायने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ट्रायल कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज करु शकता, असं सुचवलं. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करीत आहे. सीबीआयबरोबरच ईडीकडूनदेखील या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.