चिखली आणि वाकडमध्ये नागरिकांना जबरदस्तीने लुटले; तब्बल दोन लाखांचा ऐवज लंपास

0
274

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) : चिखली आणि वाकड परिसरात नागरिकांना जबरदस्तीने लुटण्याच्या तीन घटना घडल्या. तिन्ही घटनांमध्ये एकूण दोन लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला असून या प्रकरणी सोमवारी (दि. 13) चिखली आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात पद्मा विलास धायबर (वय 53, रा. कोयनानगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मा धायबर रविवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास कृष्णानगर येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. भाजी खरेदी करून परत घरी येत असताना रस्ता ओलांडताना एका दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत वेझावंदन वेलकनू (वय 45, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी काळाखडक भुमकर चौक ते डांगे चौक या मार्गावरून रिक्षाने जात होते. रिक्षाचालकाने अन्य दोन अनोळखी व्यक्ती सोबत संगनमत करून फिर्यादी यांना रिक्षातून खाली उतरवले आणि वेलकनू यांना एका दुचाकीवर बसण्यास सांगितले. फिर्यादी यांच्या डोळ्यावर मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन आणि 1000 रुपये असा नऊ हजारांचा ऐवज जबरदस्तीने लंपास करत चोरटे पळून गेले.

नीता दादासाहेब शिंदे (वय 50, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीता शनिवारी रात्री सव्वादहा वाजता रहाटणी फाटा येथे शतपावली करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 75 हजारांचे सोन्याचे मिनीगंठण जबरदस्तीने चोरून नेले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत