चिखलीत मौजमजेसाठी मोबाईल चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना अटक; ११ मोबाईल जप्त

0
1007

चिखली, दि. २९ (पीसीबी) – मौजमजेसाठी जबरी मोबाईल चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना ६० हजार रुपये किमतीच्या एकूण अकरा मोबाईलसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चिखली पोलीस ठाण्यातील पथकाने केली.

रवी पलानी शेट्टी (वय २१, रा. राजहंस सोसायटी बि.नं.१४ रुम नं.२०४, ओटास्किम, निगडी), त्याचा अल्पवयीन साथीदार, दिपक शशिकांत पवार (वय १९) आणि युवराज रतन राजपुरोहित (वय १९, दोघेही रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींचे नावे आहेत. त्यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२५) सकाळी दहाच्या सुमारास चिखली पोलीसांचे पथक चिखली पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसावा यासाठी गस्त घालत होते. यावेळी आरोपी रवी आणि त्याचा अल्पवयीन साथीदार संशयीतरित्या स्पाई रोड चिखली येथील चेरी स्विट होम चौकात उभे असलेले पोलीसांना दिसले. पोलीसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचा एक मोबाईल आढळून आला. ज्याबाबतची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दाखल आहे. यावर पोलीसांनी त्या दोघांना अटक करुन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचे आणखी दोन साथीदार मोबाईल चोर असल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले. यावर पोलीसांनी दिपक आणि युवराज या दोघांना अटक केली. तसेच या दोघांकडून ६० हजार रुपये किमतीचे ११ मोबाईल जप्त करण्यात आले. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.