‘चॉकलेट सेम आहे, फक्त रॅपर बदलले; मराठा आरक्षणावर नितेश राणेंची खोचक प्रतिक्रिया

0
679

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राज्य विधीमंडळात मराठा आरक्षणाच्या विधेयकाला आज (गुरूवार) मंजुरी देण्यात आली. यावर ‘चॉकलेट सेम आहे, फक्त रॅपर बदलले आहे,’ अशी खोचक प्रतिक्रिया आमदार नितेश राणे  यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील राणे समितीचा अहवाल उच्च न्यायालयाने रद्द केला नव्हता. तर मागच्या सरकारने उच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नव्हती, असेही नितेश राणे म्हणाले.

आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचे स्वागत करतो. मात्र, आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हजारो तरुणांना या आरक्षणाला मुकावे लागणार आहे. सरकारने याचे उत्तर द्यावे, अशी मागणी राणेंनी केली. तसेच ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सरकारने काय दिले? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात आज सादर करण्यात आले. त्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. दुपारी यासंदर्भात कामकाजाला सुरुवात होताच कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूर करण्यात आले.