चिखलीत बायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले

2285

भोसरी, दि. २० (पीसीबी) – बायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला पाण्याच्या टाकीत फेकून बापाने ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि. १९) चाकणमधील नाणेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी वडिलाला अटक करण्यात आली आहे.

सहिल सुनार असे या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे नाव आहे. चक्र उर्फ राजू सुरत सुनार असे अटक कऱण्यात आलेल्या वडीलांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्र उर्फ राजू सुरत सुनार आणि त्याची पत्नी निर्मला सुनार दोन मुलांसह गुरुवारी प्रवीण झुंजार यांच्या इमारतीतील भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते. याआधी ते कुरळी आणि भोसरीमध्ये राहण्यास होते. दोन वर्षांची मुलगी आणि आठ महिन्यांचा साहिल असा त्यांचे कुटुंब आहे. रात्री उशिरा राजू आणि त्याची पत्नी यांच्यात भांडण झाले. भांडण झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी पत्नी निर्मला दोन्ही मुलांना घरी ठेवून घर सोडून गेली. याचा राग अनावर झाल्याने राजूने त्याच्या आठ महिन्याच्या चिमुकल्याला बाथरुमजवळच्या पाण्याच्या टाकीत फेकले आणि त्याची हत्या केली.

आरोपी राजू आळंदी फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. विशेष म्हणजे पत्नी निर्मला अनेक वेळा घर सोडून गेलेली आहे.परंतु पती पत्नीच्या भांडणात आठ महिन्याच्या चिमुकल्याने जीव गमावला तर दोन वर्षांची चिमुकली उघड्यावर आली आहे.तिचा सांभाळ करण्याची वेळ चाकण पोलिसांवर आली आहे. आरोपीला चाकण पोलिसांनी अटक केलेली आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.