दुर्लक्ष झाले पण कोणी जाणीवपूर्वक अपघात घडवून आणलेला नाही – नवज्योतसिंग सिद्धू

1046

चंदिगढ, दि. २० (पीसीबी) – अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ शुक्रवारी रात्री रावण दहनाच्या कार्यक्रमा दरम्यान घडलेली घटना दुर्देवी आणि दु:खद आहे. हा अपघात होता हे सर्वप्रथम आपल्याला समजून घेतले पाहिजे. निश्चित दुर्लक्ष झाले पण हे कोणी  जाणीवपूर्वक हेतू किंवा उद्देशाने घडवून आणलेले नाही असे नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले.

अमृतसर ट्रेन दुर्घटनेतील जखमींची गुरु नानक देव रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ट्रेन प्रचंड वेगात येत असताना काही मिनिटात हा अपघात घडला. ट्रेनकडून कुठलाही हॉर्न देण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत असे नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले.

ज्या रावण दहनाच्या कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली त्या कार्यक्रमाला नवज्योतसिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर उपस्थित होत्या. दुर्घटनेनंतर नवज्योत कौर कारमध्ये बसून सिद्धू तिथून निघून गेल्या असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला होता. त्यावर नवज्योत कौर यांनी मी त्या कार्यक्रमात गेले होते आणि मी तिथून निघाल्यावर पंधरा मिनिटांनी हा अपघात झाला. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना आणि मृत्यूंचे राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या.

मला या दुर्घटनेबाबत जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मी तातडीने रुग्णालयांमध्ये आली आहे. मी इथे रूग्णांचे सांत्वन करते आहे. सकाळपर्यंत मी इथेच थांबणार आहे. माझ्यावर आरोप कणाऱ्यांना आणि माझ्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे नवज्योत कौर सिद्धू यांनी सांगितले.