चिखलीत पत्नीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन पती फरार

0
634

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – पत्नीसोबत भांडण करुन घर सोडून गेलेल्या पतीने दबा धरुन पत्नीवर कोयत्याने सपासप वार करुन पळ काढला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.१७) सकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडली.

अरुणाबाई आंबटवार असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप माधव आंबटवार (वय २५, रा. आलेगाव, ता. कंधार, जि. नांदेड) याने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, माधव गोविंद आंबटवार (वय ६०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रदीप याचे वडील माधव यांना दारूचे व्यसन आहे. तसेच ते कोणतेच काम करत नसल्याने आई अरुणाबाई आणि वडील माधव यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन माधव हे घर सोडून गेले होते. रविवारी सकाळी अरुणाबाई प्रात:विधीसाठी घराच्या खालच्या बाजूला जात होत्या. यावेळी वाटेत दबा धरुन बसलेल्या माधव यांनी अरुणाबाईंच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात कोयत्याने सपासप करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. माधव सध्या फरार आहे. चिखली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.