मनोहर पर्रीकर यांचा संघाचे प्रचारक ते देशाचे संरक्षणमंत्री संघर्षमय जीवनप्रवास    

0
546

पणजी, दि. १८ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते देशाचे संरक्षणमंत्री असा  संघर्षमय   प्रवास मनोहर पर्रीकर यांचा राहिला आहे. गोवा राज्याच्या  मुख्यमंत्रिपदाची कमानही  त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.  भाजप पक्षासह त्यांचे अन्य पक्षीयांचे  सलोख्याचे संबंध होते. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यामध्ये त्यांनी भाजपचे कमळ फुलविण्याचे किमया करून दाखवली होती. म्हणून त्यांचे दिल्ली दरबारी मोठे वजन होते.   

भाजपचे स्थान प्रस्थापित करून पक्षविस्तारामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला रोखण्यामध्येदेखील त्यांचा सिंहाचा वाटा होता.  त्यांनी पहिल्यांदा १९९१ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये पणजीमधून विधानसभेची निवडणूक लढवून जिंकलीसुध्दा होती. यानंतर त्यांचा राजकीय आलेख वाढत राहिला.

मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी आपल्या  राजकीय कारकीर्दीला सुरूवात  केली होती. ‘आयआयटी बॉम्बे’ येथून ‘मेटलर्जिस्ट’ विषयात पदवी मिळवली.  त्यानंतरही त्यांनी संघासाठी काम करणे सुरू ठेवले होते. संघाशी असलेली त्यांची जवळीक त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. संरक्षणमंत्रिपदावर असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे श्रेयदेखील त्यांनी संघाच्या शिकवणुकीला दिले होते.