चिखलीत दिवसाढवळ्या व्यावसायीकावर कोयत्याने वार

0
2142

भोसरी, दि. ३१ (पीसीबी) – चिखली येथील एका स्टीलच्या व्यावसायीकावर कोयत्याने वार करुन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी (दि.२९) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

अरविंद ओगडभाई चौधरी (वय ३२, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे वार झालेल्या व्यावसायीकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विजय सुनील कुंजीर (रा. चिखली) या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी अरविंद चौधरी हे त्यांच्या चिखली येथील पंकज स्टील नावाच्या दुकानासमोर उभे होते. यावेळी आरोपी विजय कुंजीर तेथे आला आणि त्याने, ‘ या भागातला भाई मी आहे, बघु आता तुला माझ्यापासून कोण वाचवतय’ असे बोलून चौधरी यांच्या हातावर आणि कानावर कोयत्याने वार केले आणि पसार झाला. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. चिखली पोलीस आरोपी कुंजीर याचा शोध घेत आहेत.