चिखलीतील कुदळवाडीत फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; कंपनी जळून खाक

0
759

भोसरी, दि. १ (पीसीबी) – चिखलीतील घरकुल प्रकल्पाजवळील पंचशील फिल्टर कंपनीला बुधवारी (३१ ऑक्टोबर) रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ही कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर गुरूवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास आग पूर्णपणे विझवली.   

महापालिकेने चिखलीत घरकुल प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पापासून काही मिनिटाच्या अंतरावर कुदळवाडी परिसरात पंचशील फिल्टर कंपनी आहे. अक्षय सुरेश बाफना आणि सुरेश दलीचंद बाफना यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या कंपनीला बुधवारी रात्री बाराच्या सुमारास आग लागली. या आगीने काही मिनिटातच रौद्र रूप धारण केले. या भीषण आगीत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. कंपनीला आग लागल्याची महापालिकेच्या अग्निशमन दलाला खबर मिळताच तातडीने आठ बंब घटनास्थळी पोहोचले. परंतु, आगीची तीव्रता पाहता पाण्याचे आणखी आठ टँकर मागवण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे पाच तास शर्थीचे प्रयत्न करून गुरूवारी पहाटे या आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. कंपनीमध्ये प्लास्टिक आणि कागदाचे साहित्य होते. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. कंपनीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली नव्हती. तसेच सुरक्षेचीही पुरेशी काळजी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आता या कंपनीच्या मालकांवर कारवाईची मागणी होत आहे.