राममंदिर उभारणीसाठी अयोध्येतील जागेचा ताबा घ्या- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

0
427

मुंबई, दि. १ (पीसीबी) – रामजन्मभूमी- बाबरी मशिद वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीपर्यंत पुढे ढकलली असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राममंदिर उभारणीबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे, राममंदिर उभारणीसाठी आता अयोध्येतील जागेचा ताबा घेणे आणि ती संबंधित ट्स्टकडे हस्तांतरित करणे बाकी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने तशी कार्यवाही करावी, अशी मागणी बुधवारी संघाने केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची तीन दिवसांची चिंतन बैठक बुधवारी उत्तन येथे सुरू झाली असून, यात राममंदिर उभारण्याबाबतच्या विषयावर विचारमंथन होत आहे. अयोध्येत राममंदिर कोणत्याही स्थितीत बांधले जाईल, असे स्पष्ट करतानाच, राममंदिराच्या विषयाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला विलंब होत असल्याबद्दल संघाचे सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी नाराजी व्यक्त केली. ‘अयोध्येत राममंदिर उभारले जाण्याचा मुद्दा हा देशासाठी अभिमानस्पद आहे. हा हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादाचाही विषय नाही. काही लोक त्याला धार्मिक रंग देत आहेत’, असे वैद्य यांनी स्पष्ट केले.