चिंचवडमध्ये झोपलेल्या इसमाच्या अंगावरुन वाहन गेल्याने मृत्यू

0
1092

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – पार्किंगमध्ये झोपलेल्या एका ४० वर्षीय इसमाच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी वाल्हेकरवाडी चिंचवड येथून उघडकीस आली.

भाऊराव वस्ताद घरबुडे (वय ४०, रा. चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत भाऊराव हे वाल्हेकरवाडी  येथे चिंतामणी चौकातील चाळीमध्ये राहतात. ते सिमेंटच्या गाडीवर मजुर म्हणून काम करत होते. बुधवारी (दि.२६) रात्री साडेनऊच्या सुमारास घरात झोपायला जागा नसल्याने ते घराजवळील पार्किंग परिसरात झोपले होते. यावेळी रात्री झोपेत असताना अज्ञात वाहन त्यांच्या छाती आणि हातावरुन गेले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. भाऊराव हे विवाहित असून त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. चिंचवड पोलीस  आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.