मते मागायला येता, मात्र अडचणीच्यावेळी कोणीही येत नाही; पुण्याच्या महापौरांना घेराव

0
739

पुणे, दि. २७ (पीसीबी) – मुठा कालवा फुटल्याने जनता वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. असंख्य लोकांची घरे या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी याठिकाणी भेट दिली असता त्यांना संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना घेराव घालत धक्काबुक्की करण्यात आली.  

यावेळी मते मागायला येता मात्र अडचणीच्या वेळी कोणीही लक्ष देत नाही, असा आरोप येथील महिलांनी केला. तसेच नागरिकांनी भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. घटना घडली तरीही संबंधित यंत्रणा याठिकाणी वेळेत दाखल झाल्या नाहीत, असा आरोपही येथील नागरिकांनी केला.

दरम्यान, मुक्ता टिळक म्हणाल्या की, खडकवासला धरणातून कालव्यात होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरु नये. परिसरातील नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.