चाकण येथे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून हॉटेल व्यावसायिकाला लुटले

0
771

चाकण, दि. २७ (पीसीबी) – हॉटेलची तोडफोड करुन गावठी कट्ट्याचा धाख दाखवत दोघाजणांनी मिळून एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावून हॉटेलच्या गल्ल्यातील ४ हजार ६०० रुपयांची रक्कम जबरदस्ती चोरुन नेली. ही घटना सोमवार (दि.२५) रात्री साडेअकराच्या सुमारास चाकण शिक्रापुर रस्त्यावरील हॉटेल चाकण गावरान येथे घडली.

याप्रकरणी सौरभ गोरक्षनाथ शिंदे (वय २१, रा. रासे ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोन्या उर्फ स्वप्नील संजय शिंदे (वय २७) आणि सुनिल अशोक मुंगसे (वय ३४, दोघेही, रा. रासे, ता. खेड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ यांचे चाकण शिक्रापुर रस्त्यावर चाकण गावरान नावाचे हॉटेल आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी सोन्या आणि सुनिल हे दोघेही सौरभ यांच्या हॉटेलमध्ये शिरले आणि खुर्च्या, टेबल, एलईडी टीव्ही, फ्रिज आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. तसेच आरोपी सोन्या याने सौरभ याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून हॉटेलच्या गल्ल्यात जमा झालेली ४ हजार ६०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. याप्रकरणी आरोपी सोन्या आणि सुनिल या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार अधिक तपास करत आहेत.