अजितदादांची डोकेदुखी वाढली; मावळ, शिरूरमध्ये प्रचार न करण्याचा काँग्रेसचा निर्धार

0
797

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचाराला धुमधडाक्यात सुरूवात केली असली, तरी मित्रपक्ष काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने अजितदादांची डोकेदुखी वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीमुळेच राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष झिरो झाला, हे वास्तव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे केसाने गळा कापणारा पक्ष असल्याचा काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कामापुरते जवळ करून नंतर राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी विचारपूस सुद्धा करणार नाहीत, असा ठाम विश्वास वाटत असल्याने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रचारात जायचे नाही, असा निर्धार केला आहे. त्यामुळे मावळ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीची वाट बिकट होताना दिसत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. या दोघांच्या पहिल्या प्रचार सभेला मित्रपक्ष काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अजितदादांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठकही घेतली. त्यानंतर काँग्रेसचा कोणताच पदाधिकारी किंवा कार्यकर्ता राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचाराकडे फिरकलेला नाही. पिंपरी-चिंचवड हा काँग्रेसचा मजबूत गड होता. तो अजितदादांनीच उध्वस्त केला. अजितदादांनी पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस औषधालाही शिल्लक ठेवणार नसल्याची शपथच घेतली होती. त्यानुसार राजकीय डावपेच खेळून गेल्या १५ वर्षांत त्यांनी पिंपरी-चिंचवडमधून काँग्रेसला हद्दपार केले.

आता त्याच काँग्रेसची स्वतःच्या पुत्राला विजयी करण्यासाठी अजितदादांना काँग्रेसची मदत हवी आहे. परंतु, ज्यांच्यामुळे पक्षावर आज ही वेळ आली, त्या अजितदादांना धडा शिकवण्याचा काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार न करण्याचा निर्णय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसकडे ढुंकूनही पाहणार नसल्यामुळे अजितदादांनी आताच विधानसभेबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. तोपर्यंत राष्ट्रवादीचा प्रचार न करण्याचा ठाम निर्णय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे अजितदादांची डोकेदुखी वाढणार आहे.