चाकणमध्ये भर ग्रामसभेत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; तिघांविरोधात अॅट्रोसीटीचा गुन्हा

0
433

चाकण, दि. ११ (पीसीबी) – आंबोली गावातील भर ग्रामसभेत सरपंच आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी महिलेला जातिवाचक शिवीगाळ केल्याने तिघांविरोधात अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.२८ मे) दुपारी साडेबाराच्या सुमारास मौजे सुपे येथील अंबोली गावाच्या ग्रामसभेत घडली.

याप्रकरणी सचिन कोंडीराम ससाणे (वय ३६, रा. संजय गांधीनगर, एफ/५ चे समोर मनपा वसाहत, देवणार गोवंडी, मुंबई. मुळ रा. सुपे, अंबोली ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गावचे सरपंच प्रकाश दत्तु मोहन, शिवाजी काळभोर आणि अवधुत किसन मोहन (सर्व रा. सुपे, अंबोली, ता. खेड, पुणे) या तिघांवर अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांच्या जमिनीत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बौध्दवस्तीसाठी पाण्याची टाकी जिल्हा परिषदेने उभारुन दिली आहे. त्यातून संपूर्ण बौध्द वस्तीला पाणी दिले जाते. मात्र मंगळवार (दि.२८) दुपारी साडेबाराच्या सुमारास सरपंचांनी घेतलेल्या ग्रामसभेत त्या पाण्याच्या टाकीतून संपूर्ण गावाला पाणी देण्यात यावे या विषयावरुन वाद झाला. यामुळे तिघा आरोपींनी सचिन यांच्या आई आणि मोठ्या भावाला भर सभेत जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच धमकावले आहे. याप्रकरणी प्रकाश, शिवाजी आणि अवधुत या तिघांवर अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.